
बाळासाहेबांचा वारसा सांगणाऱ्यांनी नगर परिषद निवडणुकीत सोन्याची अंडी देणारी मुंबई सोडली नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उबाठावर जळजळीत टिका
ठाणे, प्रतिनिधी
सत्ता येते आणि जाते मात्र, नाव परत येत नाही. असे बाळासाहेब नेहमी म्हणायचे, परंतु बाळासाहेबांचा वारसा सांगणारे नगरपरिषद निवडणुकीत कुठे होते ? एकही सभा घेतली नाही की प्रचार केला नाही. सोन्याची अंडी देणारी मुंबई त्यांनी सोडलीच नाही. किमान, घरबसल्या फेसबुक लाईव्ह तरी करायचे. अशी जळजळीत टिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटावर केली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये आयोजित केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात शिंदे यांनी ही टोलेबाजी केली.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका जाहिर झाल्या असुन ठाणे महापालिकेच्या १३१ जागांसाठी देखील १५ जाने. रोजी मतदान होत आहे. पालिका निवडणुका महायुतीत लढवण्याचे भाजप – शिवसेनेच्या नेत्यांनी ठरवल्याने उभय पक्षातील इच्छुकांच्या आशा आकांक्षावर पाणी फेरले आहे. शिंदे गटातील इच्छुकांमध्येही नाराजीचे सूर उमटत असल्याने या शिवसैनिकांच्या नाराजीवर फुंकर मारण्यासाठी मंगळवारी टिपटॉप प्लाझामध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना प्रोत्साहनाचे बुस्टर डोस देताना उबाठा गटाची खिल्ली उडवली. ते म्हणाले, लढाई सुरू झाली आहे, मेळावाच एवढा मोठा आहे तर सभेला किती गर्दी होईल. ठाण्यात मोठा हॉलच नाही अशी स्तुतीसुमने उधळून उपस्थित लाडक्या बहिणी आणि लाडके भावांना गोंजारले. निवडणूक आयोगाने कार्यक्रम लावला असुन सुपारी फुटली आहे. आता लगीनघाई सुरू झाली आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबांचे हे ठाणे खणखणीत नाणे आहे.गेली अनेक वर्ष ठाण्यावर फडकत असलेला भगवा कोणीही उतरवु शकत नाही. लोकसभा, विधानसभे प्रमाणेच त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार करायचे आहेत. नगरपालिका ,नगरपरिषद निवडणुकीमध्ये जास्त जागांवर लढल्याचे सांगुन एकनाथ शिंदे यांनी शिवसेना देशभरात न्यायची असल्याचे सांगितले.