
“अक्षतांजली” कार्यक्रमातुन दिवंगत सतीश प्रधानांच्या आठवणींना उजाळाठाणे.
प्रतिनिधी ठाने-
पहिले नगराध्यक्ष, प्रथम महापौर, खासदार आणि ज्ञानसाधना, ठाणे संस्थेचे दिवंगत अध्यक्ष सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात “अक्षतांजली” या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. अक्षतांजली अंतर्गत 28 नोव्हेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 या एका महिन्याच्या कालावधीत 11 विविध कार्यक्रमांचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे. आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भव्य रोजगार मेळावा, रक्तदान शिबिर, एक दिवसीय परिषद अशा अनेक कार्यक्रमांचा यात समावेश आहे. अक्षतांजलीच्या या पहिल्या कार्यक्रमात ठाण्यावर विशेष प्रेम करणाऱ्या सतीश प्रधान यांचा विचार लक्षात घेऊन ज्ञानसाधना महाविद्यालयाकडून ‘ठाणे अभिमान गीताचे’ लोकार्पण करण्यात आले. गीतकार प्रवीण दवणे, वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी गायलेले आणि स्वरूप होनप यांनी संगीतबद्ध केलेले हे गीत विद्यार्थ्यांच्या नृत्य सादरीकरणातून अधिक कल्पकतेने प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. पोलीस बँड पथकातील वादकांनीही या गीतासाठी वादन केले आहे.
अक्षतांजलीच्या या पहिल्या कार्यक्रमात परिवहन मंत्रा प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, खासदार नरेश म्हस्के इत्यादी मान्यवरांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत भावना व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणात कमलेश प्रधान यांनी, “जे इतरांसाठी एक नेता, दूरदर्शी कार्यकर्ता आहे तेच सतीश प्रधान माझ्यासाठी केवळ बाबा आहेत. त्यांच्याकडून मिळालेले संस्कार, त्यांच्या कार्यशैलीतून मिळालेले अनुभव मला खूप काही शिकवत असतात” अशा भावना व्यक्त केल्या. प्रधान साहेबांचे ऐकले आणि राजकारणाची वाट सोडल्याने आज महाराष्ट्र शासनाच्या अति महत्त्वाच्या समित्यांवर प्रमुख भूमिका निभावत असल्याची कबुली लेखक डॉ.प्रदीप ढवळ यांनी दिली. प्रधान यांचे स्नेही प्रमोद कुलकर्णी, दिनकर दामले, शशी प्रभू, डॉ.मंजिरी देव, अशोक चिटणीस आणि ज्ञानसाधना महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संदीप लेले यांनीही सतीश प्रधान यांच्याबद्दलच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. तर ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी प्रास्ताविकात सतीश प्रधान यांचे ठाण्याच्या विकासातील अनंत, अमूल्य योगदानाचा आढावा घेतला.संस्थेच्या सचिव डॉ.मानसी प्रधान यांनी सर्वच क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
चौकट – “सतीश प्रधान यांनी केवळ राजकारण केलं नाही. तर ठाणेकरांच्या गरजा लक्षात घेऊन ठाण्याच्या क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि कला अशा सर्वच क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. गडकरी रंगायतन, दादोजी कोंडदेव स्टेडियम उभारणारे सतीश प्रधान खऱ्या अर्थाने बहुआयामी ठरतात. तत्कालीन त्यांचे राजकीय सहकारी मो.दा. जोशी, प्रकाश परांजपे यांनी जोशी या सर्वच दिग्गजांच्या हृदयात ठाण्याबद्दल स्नेह आणि प्रेम होते. दादोजी स्टेडियम उभारताना त्यावेळी त्यांनी केलेले ठराव विशेष महत्त्वाचे होते, त्याची कल्पना त्यांनी मलाही दिली होती. अशा या ठाणेकराला मी मानाचा मुजरा करतो.” अशा शब्दांत आमदार संजय केळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
खासदार नरेश म्हस्के यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील अविस्मरणीय अनुभव मांडले. ज्ञानसाधना महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा कायमच अभिमान वाटतो. त्या काळात केवळ 35 टक्के असणारे विद्यार्थीच महाविद्यालयात प्रवेश घेत होते असे नाही. मी, मकरंद जोशी, चित्रपट सृष्टीतील डॉल्फी फर्नांडिस यांसारखे विद्यार्थी चांगले गुण असतानाही केवळ प्रवीण दवणे, अशोक बागवे, जयप्रकाश घुमटकर, प्रदीप ढवळ यांसारख्या शिक्षकांमुळे ज्ञानसाधनाशी जोडले गेले आणि घडले. कॉलेजमध्ये शिकत असताना विद्यार्थ्यासाठी असंख्य आंदोलने करताना प्रधान साहेबांचा निषेधही केला. परंतु त्यांनी विरोध न करता विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. हा त्यांचा मोठेपणा आहे. कमलेश प्रधान यांनी जेव्हा सतीश प्रधान यांचे तैलचित्र गडकरी रंगायतनमध्ये लावण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ती कल्पना मला खूप आवडली. कारण जे गडकरी रंगायतनचे निर्माते आहेत, त्यांचे तेलचित्र या वास्तुत असणे ही अभिमानाची बाब आहे. कमलेश प्रधानांची ही इच्छा मी प्राधान्याने पूर्ण केली. ठाणे शहर हे एक गाव होतं, त्याला खऱ्या अर्थाने आकार दिला तो प्रधान साहेबांनी. प्रधान साहेबांचे हे ऋण ठाणे शहर कधी विसरू शकत नाही. असेही म्हस्के म्हणाले.