
ठाण्यात जीएसटी अधिकाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच.
ठाणे, प्रतिनिधी
विविध मागण्यांसाठी राज्य वस्तू आणि सेवा कर (जी एसटी) कार्यालयामधील अधिकाऱ्यांचे ८ डिसेंबरपासून सनदशीर आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे त्याचा परिणाम विभागातील कामकाजावर झाला. अधिकाऱ्यांच्या आसन व्यवस्था आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करणे, विभागाची अपूर्ण पूनर्रचना, इंटरनेट आणि तांत्रिक सेवेतील अडचणी, रखडलेली पदोन्नती आणि बदल्या, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे तात्काळ भरणे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर राजपत्रित अधिकारी संघटनेने ८ डिसेंबरपासून आंदोलन पुकारले आहे. राज्य भरातील वर्ग एक आणि वर्ग दोन मधील अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. १० डिसेंबरला अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर ११ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु केले.
सलग दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने त्याचा परिणाम जीएसटी विभागाच्या कामकाजावर झाला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ राज्य वस्तू आणि सेवा कर कार्यालय आहे. या विभागातील ७७ अधिकारी सहभागी झाले होते.