
ठाणे महापालिका मुख्यालयातील अग्नी सुरक्षा. ढिसाळपालिकेत बसवलेले फायर एस्टींगेशर कालबाह्य.
ठाणे, प्रतिनिधी
गोव्यात घडलेल्या अग्नीकांडात मृत्युचे तांडव झाले. या पार्श्वभुमीवर साधारण गोव्या इतकीच २५ ते ३० लाख लोकसंख्या असलेल्या ठाणे शहराच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे शहराची सुरक्षा आणि सुविधेची जबाबदारी असलेल्या ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातच अग्निसुरक्षेची ऐशी की तैशी झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दररोज हजारो नागरीकांची येजा असलेल्या पालिका मुख्यालयातील अग्निशमन फायर एस्टींगेशर सिलेंडरची एक्सपायरी होऊन सहा महिने उलटले आहेत. त्यामुळे पालिकेची अग्नीशमन यंत्रणा कशी ढिसाळ आहे याचा प्रत्यय दिसत आहे.
गोवा येथील क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचे मृत्यू झाल्यानंतर देशभरात अग्नी सुरक्षेबाबत यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मात्र, तब्बल ४००० कोटींचे बजेट असलेली ठाणे महापालिका अग्निसुरक्षेबाबत निद्रिस्त असल्याचे समोर आले आहे. ठाण्यात तारांगणमध्ये लागलेल्या आगीमध्ये अग्निशमन जवान गमावल्यानंतरही प्रशासनाचे डोळे उघडलेले दिसत नाहीत. ठाणे महापालिका मुख्यालयातील प्रत्येक मजल्यावर अग्निसुरक्षेसाठी बसवण्यात आलेली अग्निशामक यंत्रे कालबाह्य झाल्याचे दिसत आहेत. दोन ठिकाणी २०१२ साली बसवलेले एस्टींगेशर सिलेंडर आहेत. तर खुद्द पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनाकडे जाणाऱ्या व्हरांड्यातील सिलेंडरची कालमर्यादा संपुन अनेक महिने उलटले आहेत. तेव्हा,आग अथवा एखादी दुर्घटना घडून जीवित अथवा वित्तहानी झाल्यास कोण जबाबदार असा प्रश्न नागरिक करीत आहेत.चौकट – सर्वच आस्थापनांचे फायर ऑडिट करा – भाजप गोवा येथील भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील शाळा-महाविद्यालये, हॉटेल, क्लब, मॉल, आयटी पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावे. त्याचबरोबर शाळा-महाविद्यालये, मोठे हॉस्पिटल, नर्सिंग होममध्येही अग्निसुरक्षा बाळगण्याची गरज आहे. तसेच सध्या फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.चौकट – कठोर कारवाई करा अन्यथा आंदोलन – मनसेठाणे महापालिका प्रशासन, अग्निशमन दल, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क खात्यासह पोलिस प्रशासनातील अधिकार्यांच्या संगनमतामुळे शहरातील अनेक आस्थापनांमध्ये अग्नितांडव होण्याची भीती आहे. येत्या काळात नववर्ष स्वागतादरम्यान होणाऱ्या पार्ट्यामध्ये देखील अग्नितांडव घडु शकते. तेव्हा, सर्तकता बाळगत तात्काळ या आस्थापनांवर कारवाई करावी. सुसंस्कृत ठाण्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई आवश्यक आहे. अन्यथा, मनसे स्टाईल तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.